जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समता नगर परिसरात पाण्याची मोटार बंद झाल्याचा कारणावरून चौघांकडून तरुणासह त्याच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी शनिवारी ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंकर शालिक सोनवणे (वय-३०) रा. समता नगर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास पाण्याची मोटारीची वायर निघाल्याने मोटर बंद झाली. या कारणावरून त्यांचा शेजारी राहणारे काजल वानखेडे, आदित्य वानखेडे, मनीषा वानखेडे आणि सर्फराज तडवी सर्व रा. समतानगर या चौघांनी शंकर सोनवणे आणि त्याचे वडील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. तसेच यातील एकाने लाकडीकाठी डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. या घटनेबाबत शंकर शालिक सोनवणे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी काजल वानखेडे, आदित्य वानखेडे, मनीषा वानखेडे आणि सर्फराज तडवी या चौघांविरोधात शनिवार ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.