पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार सहाय्यता निधीस – ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याची घोषणा आज या खात्याचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी हे आपापला एक दिवसाचा पगार देणार आहेत. तर मंत्री म्हणून आपण स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार आपले एक महिन्याचे वेतन हे सहाय्यता निधीस देणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिकारामध्ये स्वच्छतेचे पालन हा महत्वाचा मुद्दा असून यासाठी कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कालखंडात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीसुध्दा त्यांनी दिली.

ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, गाव पातळीवर पिण्याचे पाणी पर्याप्त मात्रेत उपलब्ध व्हावेत आणी ते पाणी सुरक्षीत असावे, सर्व पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत राहाव्या यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. सर्व हातपंप दुरूस्त राहतील याची खबरदारी बाबत सुचीत केलेल आहे. तसेच काही गावात  टंचाई असेल तर तात्काळ जिल्हाधीकार्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण करून विशेष बाब म्हणून  तात्पुरत्या पाणी पुरवठा उपाय योजना करण्याचे निर्देश  भूजल सर्वेक्षण  व विकास  यंत्रणेच्या राज्यातील जिल्हा स्तरीय अधीकार्यांना दिलेल्या आहेत.  या कालावाधीत सर्वसामान्य जनतेला आर्थीक संकटाचाही मुकाबला करावा लागणार असून त्या संदर्भात शौचालय बांधकाम पुर्ण केलेल्या सर्व कुटूबांना त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ मिळेल असे प्रयत्न केले जात आहेत.  मागील तीन महिन्यात  ३ लक्ष ५८ हजार ८६२ कुटूबांना शौचालय बांधून देण्यात आलेले आहे आणी त्यापैकी २ लक्ष ९५ हजार ८६२ कुटूबांना रूपये ३५० कोटी ४४ लक्ष रूपये प्रोत्साहनपर अनुदान वाटप केले आहे.

Protected Content