श्रीनगर : वृत्तसंस्था । भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचं ड्रोन पाडलं. या ड्रोनमधून पाच किलो आयईडी हस्तगत झालं आहे. हे ड्रोन भारतीय सीमेच्या आठ किलोमीटर आत पाडलं.
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून वारंवार ड्रोनच्या मदतीने लष्करी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आजही पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने आयईडी पुरवून दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लष्कराने रणनिती आखली होती आणि पाकिस्तानचं ड्रोन पाडलं.
“आम्हाला याबाबतची माहिती मिळाली होती. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद अखनूरजवळ ड्रोनच्या मदतीने हल्ला करणार आहे. त्या माहितीच्या आधारे आम्ही रणनिती आखली होती. रात्री १ च्या सुमारास आम्ही ड्रोन पाडलं. पाकिटबंद आयईडी उचलण्यासाठी कुणीतरी येईल याची आम्ही वाट बघत होतो. मात्र तिथे कुणीही आलं नाही. आयईडी कुठेतरी प्लांट करण्याचा कट होता. मात्र भारतीय लष्काराने दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला. हे ड्रोन चीन आणि तायवानमधील स्पेअरपार्टने तयार करण्यात आलं आहे.” असं अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी सांगितलं. “मागच्या दीड वर्षात १६ एके ४७ रायफल, तीन एम-४ रायफल, ३४ पिस्तोल, १५ ग्रेनेड आमि १८ आयईडी हस्तगत करण्यात आले आहेत. काही ड्रोनच्या मदतीने पैसेही पाठवण्यात आले होते. जवळपास ४ लाखांची रोख हस्तगत करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा ड्रोनच्या मदतीने काश्मीरमध्ये हल्ले करण्याचा कट रचत आहे”, असंही मुकेश सिंह यांनी सांगितलं.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर एअरफोर्स स्टेशनजवळ अँटी ड्रोन सिस्टम लावलं आहे. यापूर्वी २७ जूनला भारतीय वायुसेनेच्या तळावर दहशतवाद्यांनी ड्रोनच्या मदतीने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवानांना किरकोळ जखम झाली होती. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.