Home क्राईम पाटणादेवीच्या जंगलात चंदन तस्कराला अटक; १२ हजारांचा ऐवज जप्त

पाटणादेवीच्या जंगलात चंदन तस्कराला अटक; १२ हजारांचा ऐवज जप्त


चाळीसगाव (प्रतिनिधी)। पाटणादेवी गौताळा अभयारण्यात आज (दि.२५) दुपारी वन्यजीव विभागाचे पथक कंपार्टमेंट नंबर 303 परिसरात गस्त घालत असताना त्यांना काहीतरी तोडण्याचा आवाज आला असता त्या दिशेने या पथकाने शोध घेतला असता तीन चंदनचोर चंदनाचे झाडे तोडून चोरून नेण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले. या पथकाने त्यांचा पाठलाग केला असता या आरोपींनी या पथकावर प्रतिहल्ला केला. त्यामध्ये रोजंदारी वनमजूर हिरासिंग चव्हाण जखमी झाला असून दोन आरोपी जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. एक आरोपी सरदार खान मेवाती पठाण (रा. ब्राम्हणी गराडा, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद) यास या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १२ हजार रुपये किमतीचे चंदनाच्या लाकडाचे गोल आकाराचे तुकडे जप्त केले आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली अवजारे कुदळ, कुऱ्हाड, करवत व पट्टा असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या भागात चंदनचोर तथा वनसंपत्ती चोरांचे प्रमाण वाढले असून या चोरीच्या अनेक खाणा-खुणा व कापले गेलेले वृक्ष पाहावयास मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील हेमाडपंती महादेव मंदिराच्या पाठीमागील पुरातन गुफांमध्ये देखील चंदनाच्या लाकडांचा गाभाकाढून फक्त वरील साल मोठ्या प्रमाणावर पडलेले आढळून आले होते. आजही हा प्रकार या विभागात मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. या परिसरात अत्यंत मोठ्या प्रमाणावर मुबलक वनसंपत्ती वनौषधी असल्याने नेहमीच चंदन, सफेद मुसळी, डिंक, साग आदी वनस्पतीच्या चोरांचा या भागात वावर असतो. वनविभागाचे संख्याबळ अपुरे असल्याने तस्करांना रोखण्यात नेहमीच अपयश येत असते. वन्यजीव विभागाने आज केलेल्या या कारवाईत आर.एफ.ओ. चव्हाण, आर.बी. शेटे, वनपाल एस.डी. जाधव वनपाल बोढरे, देसले, शिंदे, अमृता भोई, वंदना विसपुते व इतर वन मजूर सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound