पाचोऱ्यात “सुवर्ण महोत्सवी स्नेहमिलन सोहळा” उत्साहात

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देशभर आजादीचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना धुळे येथील कृषी महाविद्यालयातील ॲग्रीकॉस – १९६८ – ७२ बॅचच्या कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांनी ५० वर्षानंतर एकत्र येऊन आपला “सुवर्ण महोत्सवी स्नेहमिलन सोहळा” पाचोरा येथे साजरा केला.

धुळे कृषी महाविद्यालयातील १९६८ – ७२ च्या माजी विद्यार्थ्यांनी दि. २४ व २५ डिसेंबर २०२२ रोजी निर्मल सिडस्‌ येथे सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. या माजी विद्यार्थ्यांनी बँकींग, कृषी संशोधन आणि विस्तार, राजकारण, उद्योग, शिक्षण, कृषी, सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टपणे काम करुन आपल्या कामाचा ठसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटविला आहे.

निर्मल सिडस्‌च्या भव्य प्रांगणात सकाळी १० वाजता सर्वांचे सपत्नीक गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.

या सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळ्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांची प्रुमख अतिथी म्हणुन प्रामुख्याने उपस्थिती होती. सुरुवातीला प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपुजन करण्यात आले. तद्‌नंतर निर्मल सिड्‌सचे व्यवस्थापकीय संचालक कै. मित्रवर्य तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्याचबरोबर बॅचमधील काही मित्र दिवंगत झालेले असल्यामुळे त्या सर्व मित्रांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी व्यासपिठावर माजी कुलगुरु डॉ. के. बी.पाटील, निर्मल सिडस्‌चे संचालक डी. आर. देशमुख, डॉ. जे. सी. राजपूत, वैशाली सुर्यवंशी, नंदलाल वाघ, डॉ. सुहास वाणी, डॉ. सुरेश कुंभार, मेहताबसिंग नाईक आदी उपस्थित होते. या सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळ्याचे प्रास्ताविक निर्मल सिडस्‌चे संचालक डी. आर. देशमुख यांनी केले. त्यानंतर सर्व कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणून सर्वांना सपत्निक स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. सुहास वाणी, डॉ. सुरेश कुंभारे, निर्मल सिड्‌च्या संचालिका वैशाली सुर्यवंशी, मेहताबसिंग नाईक इत्यादी मान्यवरांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. सायंकाळी वयाच्या सत्तरी नंतर करावयाचा योगा या विषयावर डॉ. अतुल सुर्यवंशी यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यानंतर मिलींद कुलकर्णी यांच्या गोड आवाजातील सिनेगितांनी उपस्थितांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी सकाळी आहार व विहारात गीतेचा उपदेश कसा अंमलात आणावा यावर दिलीप तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी डी. आर. देशमुख यांचा सपत्निक सत्कार केला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळे कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नंदलाल वाघ, साहेबराव क्षीरसागर, सुधाकर मेतकर, विजय पाटील, वामन देवरे, अरुण आहेर, साहेबराव पाटील व इतर सहकारी मित्रांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी निर्मल सिडस्‌चे संचालक डी.आर. देशमुख व इतर संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Protected Content