जळगाव, प्रतिनिधी । शहरातील नेहरू युवा केंद्रच्या स्वयंसेवकांनी पाचोरा येथे माणुसकीचे दर्शन घडविले आहे. लॉकडाऊनच्या काळात एका वृद्धेच्या अंत्यविधीसाठी पुढाकार घेत सर्व विधी त्यांनी पार पाडले.
पाचोरा येथील वृद्ध महिला सुनंदा निगडे यांचे पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आजाराने निधन झाले. घरात एकच व्यक्ती असल्यामुळे पाचोरा तालुक्याचे तहसीलदार कैलास चावडे व तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांनी पुढाकार घेऊन अंत विधी पार पाडण्याचे ठरविले. यावेळी नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका स्वयंसेवक रोहित धनगर व सुरज भैरू, संदीप लहासे, गणेश बागुल तसेच स्थानिक नगरसेवक व सहकाऱ्यांनी अंत्यविधी पार पाडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक जिल्हाभर प्रशासनाला मदत करून आपले कर्तव्य पार पाडत आहे.