पाचोरा, प्रतिनिधी । शहरात वाळू माफियांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतच असून उपविभागीय अधिकारी व पाचोरा तलाठी यांच्या घरावर दगडफेकी नंतर आता थेट रस्त्यावर शतपावली करणाऱ्या महिलेची छेड काढून तिच्या पतीस मारहाण केल्याने संशयिताविरोधात विनयभंग व जीवे ठार मारण्याची धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जिजामाता कॉलनीतील रहिवासी असलेले अजिंक्य सुरेश शिंदे व त्यांची २४ वर्षाची पत्नी दिनांक १२ रोजी रात्री ९.३० वाजता जेवण झाल्यावर लिलावती हॉस्पिटल समोरील रस्त्याने फिरत असतांना समोरुन वाळूचा व्यवसाय करणारा भैय्या संजय पडोळ रा. पुनगाव रोड यायुवकाने मोटार सायकलवरून येवून अजिंक्य शिंदे यांच्या पत्नीस शिविगाळ करत छातीवर मारहाण केली. याबाबत शिंदे यांनी जाब विचारला असता त्यांना देखील मारहाण करुन त्यांचा उजवा हात फॅक्चर करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
संशयिताची चौकात धुलाई
संशयित आरोपी भैय्या संजय पडोळ यास पोलिसांनी तातडीने त्याच्या राहत्या घरुन ताब्यात घेतले. यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजता घटनास्थळाजवळील चौकात नेवून पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, राहुल सोनवणे, किरण पाटील, किशोर पाटील, दिपक सुरवाडे यांनी चांगलीच धुलाई केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. भैय्या पडोळ याच्यावर यापूर्वी तलाठी आर. डी. पाटील यांच्याघरावर दगडफेक करणे यासह अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्याकडून अपेक्षा
पाचोरा शहरातील चौकाचौकात रात्रभर दारुच्या नशेत तर्र होऊन वाळूचे भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविणे, आडव्या तेवड्या मोटारसायकली चालविणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने महिलांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी अनेक पोलिस ठाण्यात त्यांचा हिसका दाखवू गुंड प्रवृत्तीच्या लोकांना चांगलेच वठणीवर आणल्याचा इतिहास अनेकांना ज्ञात आहे. पाचोरा शहरातील त्यांनी त्याची पुनरावृत्ती करावी अशी सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.