Home क्राईम पाचोर्‍यात बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक; फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

पाचोर्‍यात बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक; फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील हनुमान नगर परिसरात बाथरूममध्ये वॉटर हिटरचा शॉक लागून एका ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धनराज सुखदेव मिस्तरी (वय ४४, रा. ए-वन काट्याजवळ, हनुमान नगर, पाचोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनराज मिस्तरी हे ११ तारखेला सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले होते. यावेळी बाथरूममध्ये लावलेल्या वॉटर हिटरला स्पर्श झाल्याने त्यांना जोराचा विद्युत शॉक बसला. या घटनेत ते जागीच बेशुद्ध पडले.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून धनराज मिस्तरी यांना मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत पुढील तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात वॉटर हिटरच्या विद्युत प्रवाहामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धनराज मिस्तरी हे फर्निचर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि मदतीस तत्पर असा होता. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे हनुमान नगरसह परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत धनराज मिस्तरी यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमावल्याने कुटुंबीयांवर मोठे दु:ख कोसळले असून परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound