पाचोरा – नंदू शेलकर । पाचोरा रेल्वे स्थानकावर पंजाब मेल, विदर्भ एक्सप्रेसला थांबा मिळावा यामागणीसाठी वारंवार आंदोलने करून देखील या दोन्ही एक्सप्रेसला अद्यापही पाचोरा येथे थांबा मिळालेला नसल्याने पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून पाचोरा रेल्वे स्थानकावर पंजाब मेल, विदर्भ एक्सप्रेस, ओखापुरी – रामेश्वर एक्सप्रेस या गाड्यांना पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा म्हणून पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. मात्र या गाड्यांना पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबा मिळत नसुन यासोबतच भुसावळ ते मुंबईपर्यंत धावणारी पॅसेंजर ही पुर्ववत सुरु करण्यात यावी या मागण्यांसाठी कृती समिती आक्रमक झाली आहे. या संदर्भात २५ डिसेंबर रोजी सायंकाळी शहरातील हुतात्मा स्मारक येथे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समितीचे पदाधिकारी खलील देशमुख, सुनिल शिंदे, अॅड. अविनाश भालेराव, पप्पु राजपुत, भरत खंडेलवाल, मनिष बाविस्कर, शाहबाज बागवान, अशोक कदम, संजय जडे, प्रताप पाटील, अनिल (आबा) येवले सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या मागण्या मान्य न झाल्यास पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
पी. जे. बचाव समितीच्या प्रयत्नांना यश
ब्रिटिश कालीन पाचोरा ते जामनेर ही पी. जे. रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेताच पाचोरा शहरात पी. जे. बचाव कृती समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून अनेक वेळा सनदशीर मार्गाने आंदोलने देखील करण्यात आली. याचीच फलप्राप्ती होत अखेर रेल्वे प्रशासनाने पाचोरा ते बोदवड पर्यंत या रेल्वे लाईनचा (ब्राॅड गेजमध्ये) विस्तार करण्याचा निर्णय घेतला असुन या रेल्वे लाईन नजीक असलेल्या शेतकऱ्यांना याबाबत नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत. पी. जे. बचाव कृती समितीच्या यशानंतर आत्ता पाचोरा रेल्वे स्थानकावर पंजाब मेल, विदर्भ एक्सप्रेस, ओखापुरी – रामेश्वर एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा तसेच भुसावळ – मुंबई ही पॅसेंजर गाडी पुर्ववत सुरु करण्यात यावी या सह पाचोरा रेल्वे स्थानकावर अद्ययावत सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात या मागण्यांसाठी पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच ब्रिटीश कालीन पाचोरा ते जामनेर या नॅरो गेज रेल्वेचे कोळशावर चालणारे इंजिन हे पाचोरा रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात यावे अशी मागणी देखील पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीच्या वतीने याप्रसंगी करण्यात आली आहे.