पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ विभागाचे डी. आर. एम. यांनी आज १३ जानेवारी रोजी पाचोरा रेल्वे स्थानकावर भेट देऊन पाचोरा ते जामनेर या स्टेशनचा पाहणी दौरा केला. पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीचे विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा व निवेदन सादर करण्यात आले आहे.
पाचोरा ते जामनेर (पी. जे.) पॅसेंजर रेल्वे ही रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या पार्श्र्वभूमीवर पाचोऱ्यासह शेंदुर्णी, पहुर, भगदरा, जामनेर येथील समविचारी व्यापारी व प्रवाशी यांनी एकत्रित येवुन पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती गठीत करुन त्यांच्या भावना जुळलेल्या पाचोरा ते जामनेर रेल्वे प्रवास बंद होवु नये म्हणुन वेळोवळी आंदोलने, मोर्चे काढुन विरोध दर्शविला. याचीच फलप्राप्ती म्हणुन रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करत पहिल्या टप्प्यात पाचोरा ते जामनेर पर्यंत नॅरोगेज ऐवजी ती रेल्वे लाईन ब्रॉडगेज करत थेट बोदवड पर्यंत नेण्याचा निर्णय घेतला असुन त्याच अनुषंगाने आज १३ जानेवारी रोजी भुसावळ येथील डीआरएम – एस. एस. केडिया यांनी पाचोरा रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला.
पाहणी दौऱ्या दरम्यान पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डीआरएम यांची भेट घेऊन पाचोरा रेल्वे स्थानकावर पंजाब मेल, विदर्भ एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा मिळावा, भुसावळ ते मुंबई ही पॅसेंजर पुर्वीच्या वेळेवर पुर्ववत सुरु करण्यात यावी, सद्यस्थितीत सुरू असलेली इगतपुरी ते भुसावळ या मेमु गाडीची वेळ पुर्ववत म्हणजेच पाचोरा रेल्वे स्थानकावर सकाळी ८:३० वाजेची करण्यात यावी जेणेकरून या गाडीने नियमित ये – जा करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी व विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांची सुरू असलेली ससे हेलपाट थांबेल, पाचोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे डब्बा क्रंमाक इंडिकेटर बसविण्यात यावेत, तसेच पाचोरा रेल्वे स्थानकावर चार लिफ्ट बसविण्यात याव्यात यासोबतच रेल्वे क्रंमाक १२६२७ (कर्नाटक एक्सप्रेस), ०९७४० (साईनगर – जयपुर एक्सप्रेस), १६५०१ (अहमदाबाद – बैंगलोर एक्सप्रेस), १६७३४ (ओखा – रामेश्वर एक्सप्रेस) या रेल्वे गाड्यांना पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा या मागण्यांसंदर्भात चर्चा करुन निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी खलिल देशमुख, अॅड. अविनाश भालेराव, सुनिल शिंदे, भरत खंडेलवाल, पप्पु राजपुत, प्रा. मनिष बाविस्कर, प्रा. गणेश पाटील, नंदकुमार सोनार, संजय जडे, निलेश कोटेचा, शाहबाज बागवान, प्रताप पाटील, अॅड. आण्णा भोईटे, शशिकांत मोरे उपस्थित होते.