पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी दाखल अर्जांमधून तीन अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच्या दिवसाखेर १८ जागांसाठी एकूण २३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पाच तारखेला अर्जाची छाननी करून दि. ६ रोजी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यात सेवा सहकारी संस्था मतदार संघातील अनंतराव सोनिराम पाटील, ग्रामपंचायत मतदार संघातील अनिता दगडू पाटील व ग्रामपंचायतीतुन अनुसूचित जाती जमाती रमाबाई कौतुक चव्हाण असे तीन अर्ज थकबाकी न भरणे, जातीचे प्रमाणपत्र न जोडने अशा विविध कारणांमुळे अवैध करण्यात आले आहेत.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सेवा सहकारी संस्थेतुन सर्वसाधारण – (७) महिला राखीव (२), इतर मागासवर्गीय (१), विमुक्त जाती भटक्या जमाती (१) अशा ११ जागा, ग्रामपंचायत मतदार संघासाठी सर्वसाधारण – (२), अनुसूचित जाती / जमाती – (१), आर्थिक दुर्बल घटक (१), व्यापारी मतदार संघ (२) व हमाल मापाडी मतदार संघ (१) अशा १८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २३१ अर्ज वैध झाले असले तरी २० एप्रिल ही माघारीची शेवटची तारीख असल्याने त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपाच्या काही लोकांना सोबत घेऊन पॅनल तयार करण्याच्या तयारीत असून त्यासाठी दोघांमध्ये बोलणी सुरू असून उबाठा गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी हे त्यांच्या पक्षाचे स्वतंत्र पॅनल तयार करून निवडून लढण्याचे संकेत मिळत आहे.