पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी) ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या वचनाप्रमाणे वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून येथील गृप ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमच वट पौर्णिमेनिमित्त महिलांना वडाच्या २५० रोपांचे वाटप करण्यात आले.
वाघूर नदीतीरी असलेल्या श्री. क्षेत्र केवडेश्वर मंदिर येथे पूजेसाठी आलेल्या महिला भाविकांना सरपंच नीता रामेश्वर पाटील यांच्याहस्ते वडाची रोपे वितरीत करण्यात आली. काल सायंकाळी तासभर दमदार पाऊस झाला. या पहिल्या पावसाचे स्वागत करीत आज ग्रामपंचायतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानांर्गत वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून सदर उपक्रम राबविला होता. यावेळी महिलांनी वटवृक्षाचे मनोभावे पुजन केले. या रोपांचे लहान मुलांप्रमाणे संगोपन करणार असल्याचा मानस महिलांनी यावेळी बोलून दाखवला. या झाडांसाठी ग्रामपंचायतीतर्फे ‘ट्री-गार्ड’ पुरविले जाणार असल्याचे सरपंच नीता पाटील यांनी यावेळी सांगितले. धनगर समाज संघर्ष समितीचे प्रमुख रामेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्या मिना पाटील यांच्यासह मोठया संख्येने महिला यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद नरवाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.