जळगाव प्रतिनिधी । शहरातील सम्राट कॉलनी भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत महापौर भारतीताई सोनवणे यांनी आज पहाटे चार वाजता या भागाला भेट देऊन नागरिकांशी वार्तालाप साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शहराच्या नवीन सम्राट कॉलनी परिसरात नागरिकांना पाणी कमी दाबाने येत असल्याने त्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी तक्रार केल्याने महापौर सौ.भारती सोनवणे सोमवारी पहाटे चार वाजताच प्रभागात पोहचल्या. पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याबाबत महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नागरिकांशी चर्चा करून माहिती घेतली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी व्हॉल्व्हमनला बोलावून पाणी पूर्ण दाबाने देण्याचे आणि काही वेळ वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही त्यांचे नळ संयोजन तपासावे आणि ज्या गल्लीत पाणी येत नाही तिथे नवीन जोडणी करून देण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, सुशील हसवाणी, संजय लुल्ला, अनिल जोशी, विक्की सोनार, दीपक जोशी आदी उपस्थित होते.