मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात त्या त्या भागातील परिस्थिती पाहूनच लॉकडाउनबद्दल निर्णय घेतले जातील असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे .
“रेड झोनमधील गावांना सध्या कोणताही धोका पत्करण्याची गरज नाही. त्या जिल्ह्यात जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या तालुक्यांमध्ये कडक निर्बंध करावेत आणि ज्या तालुक्यात रुग्ण नाही तिथे थोडी सवलत द्यावी. तसंच बाकीच्या जिल्ह्यात मात्र टप्प्यापटप्य्याने लॉकडाउन कमी करावा आणि शिथीलता द्यावी असा विचार असून त्यादृष्टीने पाऊल टाकत आहोत,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
“मुंबईची लोकल सुरु करू नका कारण तिथे कोरोनाचा मोठा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे रेल्वेत जी गर्दी होते त्याचा गांभीर्याने विचार व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. म्हणून आम्ही अत्यावश्यक सेवा सोडून कोणालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी देणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
“राज्यात ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. राज्यातील १५ जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे. सरसकट लॉकडाउन उठवता येत नाही. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणं अडचणीचं ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री ३१ मे च्या आधी निर्णय घेतील,” असं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.