मुंबई प्रतिनिधी । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर अकोला येथील पोलीस स्थानकात अॅट्रॉसिटीसह अन्य कलमांतर्गत गुन्हे दाखल झाल्याने त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी वसुलीबाबत आरोप करून परमबीरसिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यामुळे देशमुख यांचे मंत्रीपद गेले असून त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. यानंतर आता परमबीर हे स्वत: गोत्यात सापडले आहेत.
परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीच्या विरुध्द अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये परमबीर यांच्या विरोधात तब्बल २७ विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भिमराव घाडगे यांना एका खोट्या चकमक प्रकरणी परमबीर सिंग यांनी अडकविले होते. काही बिल्डरांना गुन्ह्यातून वाचविण्यास परमबीर सिंग यांनी घाडगे यांना सांगितले होते. परंतु त्या बिल्डरांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्यांना वाचवू शकत नाही, असे सांगत घाडगे यांनी परमबीर सिंग यांना नकार दिला होता. घाडगे हे आपले ऐकत नसल्याने परमबीर सिंग यांनी त्यांच्या विरुध्द कट रचला होता. एका खोट्या चकमकीच्या गुन्ह्यात त्यांना अडकविले होते. नंतर या प्रकरणाचा तपास झाला आणि त्या गुन्ह्यातून न्यायालयाने भिमराव घाडगे यांना निर्दोष सोडले होते.
या प्रकरणात परमबीर सिंग यांना कधीही अटक होवू शकते.