भुसावळ प्रतिनिधी । येथील पत्रकारांच्या मदतीने एका महिलेची तिच्या कुटुंबासोबत भेट घडली आहे.
लॉकडाऊनमध्ये पत्रकार आपली भूमिका अतिशय चोखपणे बजावत असून प्रत्येक घटनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करत असतात. अशाच परिस्थितीत वृत्तसंकलन व फोटोग्राफी करणे एवढाच हेतू मनात न बाळगता जळगाव जिल्ह्यातील वृत्तवाहिनीचे पत्रकार ब लोकमत वृत्तपत्राचे छायाचित्रकार श्याम गोविंदा, इम्तियाज अहमद व मंगेश जोशी या तिघांच्या प्रयत्नांनी गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून दूर झालेल्या एका दिनदुबळ्या वृद्ध महिलेला आपल्या कुटुंबा सोबत भेट करून देत माणुसकी जोपासली.
धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील ७० वर्षीय रंजनाबाई दत्तात्रय चिंचोले ही वृद्ध महिला दहा वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून विभक्त होती. पत्रकारांनी प्रयत्न केल्याने त्या वृद्ध महिलेचे भाऊ व नातेवाईक त्यांना घेण्यास आज भुसावळ येथे आले होते. नगरपालिका रुग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करून छायाचित्रकार श्याम गोविंदा, मंगेश जोशी, इम्तियाज अहमद यांनी या वृद्ध महिलेला जिल्हा सीमेवर त्यांच्या नातेवाईकांच्या सुपूर्द केले. दरम्यान, त्या महिलेच्या भावाने भुसावळातील तीनही पत्रकारांचे आभार मानले.