जळगाव, प्रतिनिधी | संशोधन विभागाची गोगलगायीच्या गतीने वाटचाल सुरु असून संशोधकांचे भवितव्य अंधारात आले आहे. याची जबाबदारी प्र-कुलगुरू यांना पेलवत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पतित पावन प्रतिष्ठानतर्फे कुलगुरू पी. पी. पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, पीएचडीसाठीच्या २२ नोव्हेंबर २०१८ च्या नियमावलीनुसार विद्यापीठाने पेट एक्झाम फॉर्म भरण्याची मुदत 29 एप्रिल 2019 ते 20 मे केले विद्यापीठाच्या पेट परीक्षा घेण्याआधी मार्गदर्शकाची यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते परंतु ती यादी प्रसिद्ध करण्यात विद्यापीठ असमर्थ ठरले आहे. त्यानंतर 1 जून 2019 हॉल तिकीट मिळणार होते व परीक्षेची तारीख 9 ते 12 जून होती. विद्यापीठाकडून परीक्षेची तयारी न झाल्याने नेट सेटची परीक्षा असल्याच्या नावाखाली परीक्षेचे वेळापत्रक जूनच्या अखेरीस प्रसिद्ध करतील असे विद्यार्थ्यांना कळविले.
जून २०१९ अखेरीस विद्यार्थ्यांना सूचना न देता १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आली पीएचडी पूर्व परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी आजतागायत विद्यापीठाच्या वेबसाईटवर नाही. बरेच निवेदन दिल्यावर विद्यापीठाकडून ८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रोविजनल गाईड लिस्ट जाहीर केली. त्यानंतर ऑगस्ट २०२० ला फायनल गाईड लिस्ट विद्यापीठाकडून जाहीर झाली. गाईड तसेच विद्यार्थ्यांना विल्लींग्नेस लेटर १८ ऑगस्ट २०२० पासून अपलोड करायचे होते. परंतु, मार्गदर्शकांना लॉगीन आयडी प्राप्त झाले नाही.
संशोधकांचा संशोधनाचा विषय आणि एचडी कोर्स वर्क २०२० मध्ये पूर्ण होईल का ? असा प्रश्न पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडला आहे. कोरोनाची स्थिती विचारात घेता विद्यार्थ्यांच्या संशोधनाच्या विषयांना त्वरित मान्यता द्यावी,कोर्स वर्क व त्याची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पतित पावन प्रतिष्ठान तर्फे देण्यात आला आहे.
निवेदनावर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज चौधरी, वीरेश पाटील, सुरेंद्र कोल्हे, किरण अहिरे, इमाम पिंजारी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.