पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास ; ‘पीएमओ’चे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करुन, त्यांची विधाने मोडतोड करुन आरोप केले जात आहेत. इतकेच नाही तर, पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते की, ‘लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल’वर भारतीय सैन्याच्या १६ बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनचा डाव उधळून लावला. त्यामुळेच चीनला आमच्या सीमेत घुसता आले नाही, असे स्पष्टीकरण ‘पीएमओ’ने दिले आहे. दरम्यान, चीन-भारत संघर्षावरून मोदींच्या वक्तव्यावर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर चीनने भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींवर प्रश्नांची सरबत्ती करुन, जर घुसखोरी केली नाही तर भारताचे 20 जवान शहीद कसे आणि कुठे झाले? असा प्रश्न विचारला होता. या गदारोळानंतर आता पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चीनच्या आगावूपणाला भारत कडक उत्तर देईल असा इशाराही पंतप्रधान कार्यालयाने काढलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. भारतीय जवानांनी १५ जूनला जे धाडस दाखवले, जे बलिदान दिले त्यानंतरच्या परिस्थितीवर पंतप्रधानांनी ते वक्तव्य केले होते. भारताचे जवान सीमेचे संरक्षण करत असताना असे वाद निर्माण केले जाऊ नयेत असेही पीएमओने म्हटले आहे. भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनी जवानांना भारतीय सैनिकांनी पिटाळून लावले होते. गेल्या ६० वर्षांमध्ये चीनने किती जमीन बळकावली आहे ते सर्व देशाला माहित आहे असेही पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Protected Content