सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खिरोदा येथील युवा चित्रकार पंकज वानखेडे यांच्या निसर्ग चित्रांचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्स, पासपोर्ट ऑफिस शेजारी, स्टार झोन मॉल, शिखरेवाडी, नाशिकरोड, नाशिक येथे दिनांक १७मे ते ३०मे दरम्यान भरविण्यात येणार आहे.
खिरोदा येथील धनाजी नाना विदयालयात संगीत व तबला शिक्षक असलेले पंकज वानखेडे सातपुड्याच्या डोंगर दर्याखोर्यात फिरतांना ,डोळ्यात साठवलेली निसर्गाची मुक्त उधळण शब्दांच्या पलीकडे जाऊन जलरंगाच्या मिश्रणाद्वारे हातातील कुंचल्याच्या साहाय्याने चित्राच्या माध्यमातून निर्सगसौंदर्याचा अनुपम्य साक्षात्कार आपल्या निसर्गचित्रातून घडवतात.
हा निसर्गसौंदर्याचा अनोखा नजराणा चित्रांच्या गॅलरीतून आपणास आस्वादता येतो. यांचे आतापर्यंत जहॉंगिर आर्ट गॅलरी मुबंई, कालिदास कलाभुवन अकोला, नेहरु सेंटर मुंबई ,आर्ट प्लाझा गॅलरी; मुबंई व पु.ना.गाडगीळ जळगाव येथे भरवलेल्या चित्रांच्या प्रदर्शनला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.
आपल्या चित्रांतून ते रसिकांना भान विसरायला भाग पाडतात. निसर्गचित्र हा त्याचा चित्रकलेचा मुख्य विषय असून सातपुडयाच्या डोंगर रांगाचे विलोभनिय नयनरम्य दृश्य ,तेथिल निसर्गसौंदर्य,निर्सगातील विविध छटा रंगाच्या मिश्रणातून सुंदररित्या रेखाटतांना ते तासन तास मंत्रमुग्ध होत असल्याचे परिसरातील नागरीक मोठ्या कौतुकाने सांगतात.सातपुडा पर्वतरांगेत निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण ते अचूक हेरतात.व आपल्या चित्रांतून रेखाटुन त्यात जलरंगाची मिश्रणातून जीव ओतून चित्र साकारतात.
पंकज वानखेडे हे चित्र साकारतांना त्यात विविध रंगाची केलेले मिश्रण केवळ रंगांसाठीच न वापरता ,त्यात निसर्गघटकांतील भाव, भावना आणि निर्सगातील मुक्त हालचाल टिपण्यासाठी केलेला वापर रसिकप्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो.ते चित्र पाहतांना मानवी मनाला आलेला जडपणा आपोआप दूर होऊन माणूस निसर्गाशी ,मातीशी नाते घट्ट जुळवू पाहतो.मन पळत असतं,फिरत असतं,मनाचा भोवरा होतो.हा भोवरा गरगरत राहतो-त्या चित्रातील झाडांभोवती,वेलीभोवती,त्यावर पडलेल्या सूर्यांच्या प्रतिबिंबाभोवती ,डोंगरावर,निळ्याशार आकाशातील ढगांवर, पाण्यावर,मातीवर, आकाशात सर्वीकडे मन फिरुन येते.
निसर्ग आणि त्यातील विविध छटा यातील साम्य शब्दांच्या पलीकडे जाऊन ते चित्रांद्वारे रेखाटतात.हा चित्राच्या दुनियेतला नवखा नजराणा पाहण्यासाठी,अनुभवण्यासाठी हा अनुपम्य निसर्गसोहळ्याचा साक्षात्कार घेण्यासाठी दि. १७ मे ते पासून दि.३० मे पर्यंत खुल्या असणार्या चित्रप्रदर्शनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.