जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा न्यायालयात बुरखा घालून पोलिसांनी हजर केलेल्या संशयितांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न जळगाव शहर पोलिसांनी उधळून लावला होता. यात एकाला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून गावठी कट्टा तसेच जीवंत काडतूस जप्त केले होते. यादरम्यान एक जण फरार झाला होता, या फरार संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवार, २१ फेब्रुवारी रोजी कल्याण येथून ताब्यात घेतले आहे. सुरेश रवी इंधाटे (वय-२८) रा – पंचशील नगर बुद्ध विहाराच्या मागे भुसावळ असे संशयिताचे नाव आहे.
मुलाचा ज्यांनी खून केला, त्याचा संशयितांचा बदला घेण्यासाठी मयत मुलाचे वडील मनोहर सुरळकर हे सुरेश इंधाटे याला सोबत घेत सोमवारी भुसावळ येथून जळगावात आले होते, यादरम्यान कुणालाही संशय येवून नये म्हणून दोघांनी मुस्लिम महिला बुरखा घालतात तो बुरखा घातला होता, व जिल्हा न्यायालयात मंदिराच्या जवळ ते दोघेही दबा धरुन संशयितांच्या प्रतिक्षेत बसले होते, या मुस्लीम पेहरावातील दोघांना पाहून पोलिसांच्या एका खबर्याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलिसांना माहिती दिली, त्यानुसार शहर पोलिसांच्या पथकाने मनोहर सुरळकर यास अटक केली होती, त्याच्याकडून गावठी कट्टा व पाच जीवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. यादरम्यान झटापटीत सुरेश इंधाटे हा पळून गेला होता, फरार सुरेश इंधाटे कल्याणमध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यांचे पथक कल्याण येथे रवाना केले होते. मंगळवारी दुपारी पथकाने सुरेश इंधाटे यास ताब्यात घेतले आहे, शेवटचे वृत्त हाती तोपर्यंत संशयित सुरेश इंधाटे यास सोबत घेवून पथक जळगावच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती मिळाली.