जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाघ नगर परिसरातील जिजाऊ नगरात राहणारे ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेश बन्सीलाल फुलपगारे (वय-४३) रा. जिजाऊ नगर, वाघ नगर, जळगाव असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, राजेश बन्सीलाल फुलपगारे हे वाघ नगरातील जिजाऊ नगरात एकटेच वास्तव्याला होते. शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान यांच्या मुकबधिर विद्यालयात शिक्षक होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची पत्नी मालेगाव येथे विभक्त राहत होत्या. घरी एकटेच राहत असल्याने नैराश्येत होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना घर बंद असल्याची शंका निर्माण झाली. राजेश फुलपगारे हे घरातून बाहेर येत नाही त्यामुळे त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना राजेश यांनी आतून दरवाजा बंद करून गळफास घेतल्याचे लक्षात आले. याघटनेची माहिती जळगाव तालुका पोलीसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नजन पाटील, पोलीस कर्मचारी अनिल फेगडे यांनी धाव घेवून पंचनामा केला. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.