जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या युवा, खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक दिनानिमित्त बळीराम पेठ भाजी बाजारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. युवकांनासोबत घेत सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आज जागतिक स्वयंसेवक दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी उपक्रम राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. जळगाव शहर विभागातर्फे बळीराम पेठ परिसरातील भाजी बाजारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजीपाला विक्रेत्यांकडून रस्त्यावर घाण टाकली जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी भाजीपाला विक्रेत्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत नियमीत सफाई करण्याचे आवाहन केले.भाजी बाजाराच्या सर्व गल्ल्यांमध्ये युवा स्वयंसेवकांना सोबत घेऊन ही मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी युवा स्वयंसेवक हेतल पाटील, रोहन अवचारे, हर्षल चौधरी, सचिन चौधरी, गणेश देवरे, गौरव चौधरी, वसीम खान, रविंद्र ठाकरे, चेतन पाटील, जकी अहमद यांनी परिश्रम घेतले.