पुणे : वृत्तसंस्था । सीएमईमध्ये एक नेपाळी तरुणी सात महिन्यांपासून राहात असल्याची घटना उघडकीस आली आहे. भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीला अटक केली आहे. एलिसा (२६) असं अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.
पुण्यातील सीएमईमध्ये २३ मार्च रोजी नेपाळी तरुणी एलिसाने मॅकडोनाल्ड शॉप फुगेवाडी येथून भिंतीवरून उडी मारून लष्करी रहदारी असलेल्या सीएमईमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याच उघड झालं आहे. नेपाळी तरुणी लष्करातील सरकारी अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये राहत असल्याचं पोलीस तक्रारीत सांगण्यात आलं आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय आनंदराव काळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एलिसाला अटक केली आहे. लष्कराच्या मालमत्तेस आणि लष्कराच्या अधिकारी, जवानांच्या जीवितास धोका निर्माण करण्यासाठी तेथे राहात असल्याच्या संशयावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही नेपाळी तरुणी दुबईवरून मलेशिया, नेपाळ आणि त्यानंतर मुंबईमध्ये आली असल्याचं विश्वासनीय सूत्रांनी सांगितलं आहे. पुण्यामध्ये एका मित्राकडे राहत होती. त्यानंतर तिने दापोडी सीएमई जिथे लष्कर अधिकारी, कर्मचारी राहतात त्या ठिकाणी अनधिकृतपणे गेली होती.