बुलडाणा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सातत्याने लक्षवेधी आणि जीवघेणी आंदोलने केली आहेत. त्यांच्या या आंदोलनाचे फलीत देखील दरवेळी दिसून येत आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळवून दिल्यानंतर आता नुकसान भरपाईची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचे हे आणखी एक मोठे यश आहे.
सोयाबीन -कापसाला दरवाढ, पीकविमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासह इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला विराट एल्गार मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन जलसमाधी आंदोलनासाठी मुंबईत धडक दिली. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून बुलढाणा जिल्ह्यासाठी १२४.२४ कोटी व वाशीम जिल्ह्यासाठी ३२.७७ कोटी असे एकूण १५७ कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आधीचे मंजूर असे बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण १७४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर याच आंदोलनावेळी पीकविमा कंपनीने तातडीने १०४ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. यासह राज्यशानाने बहुतांश मागण्या मान्य केल्या ही या आंदोलनाची मोठी फलश्रृती होती. त्यानंतरही तुपकरांचा इतर मागण्यांसाठी गल्ली ते दिल्लीपर्यंतचा पाठपुरावा सुरुच होतो. दरम्यान शासनाने मंजूर केलेले १७४ कोटी रुपये ऑनलाईनच्या खोड्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने तुपकरांनी ११ फेब्रुवारी रोजी आत्मदहन आंदोलन केले.
या आंदोलनाचा धसका घेत आंदोलनाच्या एक दिवस आधी १० फेब्रुवारी रोजी पीकविम्याचे ९ कोटी ७८ लाख शेतकऱ्यांचा खात्यात जमा करण्यात आले तर आंदोलनानंतर ४२ कोटी ५९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या रखडून पडलेल्या ऑनलाईन याद्या तयार करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतरही १७४ कोटी रुपयांचे वितरण न झाल्याने तुपकरांनी पुन्हा पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. आता सदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १ लाख ६२ हजार ७३ शेतकरी यासाठी पात्र आहेत. यातील ९० हजार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या असून २९ मार्चपर्यंत जवळपास ३८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होणार आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची हे आणखी एक मोठे यश ठरले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
तुरुंगात जाण्याचे फळ
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी रविकांत तुपकर गेल्या २० वर्षांपासून लढा देत आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाने शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही पाडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे आजवरचे आंदोलने खऱ्याअर्थाने यशस्वी ठरली आहेत. ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मदहन आंदोलनात त्यांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागला, गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले, तरुगांत जावे लागले ही खंत एका बाजूला असली तरी याच आंदोलनामुळे १ लाख ६२ हजार ७३ शेतकऱ्यांच्या खात्यात १७४ कोटी रुपयांची रक्कम जमा होत असल्याने तुरुंगात जाण्याचे सकारात्मक फळ मिळाले.