मुंबई: वृत्तसंस्था । शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळं संतापलेल्या माजी खासदार नीलेश राणे यांनी आता शरद पवारांच्या एका वक्तव्याचा आधार घेत मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले आहे.
नीलेश राणे यांच्या ट्वीटला शिवसेनेनं दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याचा संदर्भ आहे. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. त्यावेळी, विधानसभेवर एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीनं महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या या नाऱ्यामुळं चर्चेला उधाण आलं होतं. महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं बोललं जात होतं. उद्धव यांच्या या घोषणेबद्दल नाशिक येथे पत्रकारांनी पवारांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर, शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या ३० वर्षांपासून ऐकतोय, अशी टिप्पणी पवार यांनी केली.
पवार यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत नीलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचणारं ट्वीट केलं आहे. ‘मानलं पवार साहेब आपल्याला… महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानफाटातही दिली,’ असं नीलेश यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावरूनही नीलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. . पंचनामे झाले आता पुढे काय? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा,’ असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला आहे.