नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नीट आणि जेईई परीक्षा परीक्षा वेळेतच होतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. न्यायालयाने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित असून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. त्यानुसार आता आता जेईई मेन २०२० चे आयोजन १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर तर नीट २०२० चे आयोजन १३ सप्टेंबर रोजी निश्चित वेळापत्रकानुसार होणार आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्या. बीआर गवई आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने याप्रकरणी निर्णय देत म्हटले की, ‘आयुष्याला असे थांबवू शकत नाहीत. आपल्याला सुरक्षा उपायांनी पुढे जाणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावू शकत नाही.’ दरम्यान परीक्षा रद्द करून आपले एक वर्ष वाया घालवायचे आहे का? असा सवालही न्यायालयाने याचिका दाखल करणार्या विद्यार्थ्यांना विचारला. तर धोरणात्मक निर्णयात आम्ही हस्तक्षेप करु शकत नाही असंही यावेळी न्यायालयाने सांगितले.