जळगाव प्रतिनिधी । निमजाई फाऊंडेशनतर्फे फाऊंडेशनतर्फे आशादीप महिला वसतिगृहातील महिलांना बुधवारी मकर संक्रांतीनिमित्त साड्या वाटप करण्यात आल्या. यासोबतच येथील महिलांना आनंद मिळावा म्हणून त्यांच्यासोबत संगीतखुर्ची सह विविध खेळ खेळुन आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमामुळे वसतीगृहातील महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
निमजाई फाऊंडेशनतर्फे आशादीप महिला वसतिगृहात मकरसंक्रांती निमित्ताने हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर निमजाई फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल पाटील, सचिव भूषण बाक्षे, वसतिगृहाच्या अधीक्षिका रंजना झोपे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला अधीक्षिका झोपे यांच्यासह वसतीगृहातील कर्मचार्यांचे शीतल पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. वसतिगृहात आश्रयास असलेल्या महिलांना शीतल पाटिल यांच्याहस्ते हळदी कुंकु करुन साड्यांचे वाटप करण्यात आले.
अधीक्षिका झोपे यांनी वसतिगृहातील महिलांसह वसतिगृहाच्या कामकाजाची माहिती दिली. शीतल पाटील यांनी निंमजाई फाऊंडेशनच्या सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी तर आभार समन्वयक दीपक जावळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निमजाई फाऊंडेशनचे विवेक जावळे, रुपम जावळे, कुणाल कोलते, महेश पाटील, शिक्षिका रुपाली पाटील, अर्चना पाटील, हेमलता इंगळे, पूनम चौधरी, योगिता सपकाळे, नितु चौधरी यांच्यासह वस्तीगृहाचे लिपिक एस.एस. शेलोळे, काळजी वाहक एस.ए. ठाकरे, आर.के.पिंजारी, सुरक्षारक्षक जितेंद्र वाघ, संतोषी करोसीया आदींनी परिश्रम घेतले
वसतीगृहातील महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देणार
याप्रसंगी शितल पाटील यांनी मनोगतात माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय कार्यक्रम असल्याचे नमुद केले. येथील महिला एकट्या नसुन त्याच्या पाठिशी निमजाई फाऊंडेशन खंबीरपणे उभे असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच येथील महिलांना कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत फॅशन डिझायनिंग तसेच ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देणार असुन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. अधीक्षकांसोबत चर्चा करून शासनाच्या नियमानुसार लवकरच हा उपक्रम हाती घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या .
महिलांसोबत खेळले विविध खेळ
निमजाई फाऊंडेशनच्या कौशल्य विकासअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या विद्यार्थिनींनी वसतिगृहातील महिलांसोबत लिंबू चमचा, संगीत खुर्ची तसेच फुगे फुगवुन फोडणे इत्यादी खेळ खेळले. या खेळांमधील विजेत्या वसतिगृहातील महिलांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले. तीन ते चार तासांपर्यंत फाउंडेशनच्या विद्यार्थिनींनी या महिलांसोबत आनंदोत्सव साजरा करत वेळ घालविला. या कार्यक्रमाने वसतिगृहातील महिला आनंदाने भारावल्या होत्या. अनेक दिवसांनंतर त्यांच्या चेहऱयावर हास्य फुलले होते. याबद्दल मनोगतात वसतिगृहातील महिलांनी हा कार्यक्रम अविस्मरणीय राहिल असे सांगून त्याबद्दल फाऊंडेशनचे आभारही मानले.