पहूर ता.जामनेर, प्रतीनिधी । येथून जवळच असलेल्या खर्चाणा येथील व्यक्तीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटिव्ह नसतांना तो अहवाल पॉझिटिव्ह जाहीर केला. नंतर त्याच व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह ठरविण्यात आला. याची सखोल चौकशी करून आरोग्य विभागातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी पहूर राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पहूर येथील कोवीड सेंटरमध्ये कोरोना संशयित म्हणून अपमानास्पद वागणूक दिली याप्रकरणी जामनेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संजय गरूड व प्रदीप लोढा यांच्या मार्गदर्शनानुसार नायब तहसीलदार सुभाष कुंभार यांना निवेदन देण्यात आले. खर्चाणे येथील गिरीश पंडित पाटील यांच्या सोबत कोरोना संशयित म्हणून झालेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या परिवारातील तसेच गावातील इतर नागरिकांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. शासनाला तहसिलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश पाटील, उपसरपंच शाम सावळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, राजू जंटलमॅन, ईश्वर बारी आदी उपस्थित होते.