रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात रेशन दुकानांमार्फत वितरित करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या ज्वारीच्या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला असून आमदार अमोल जावळे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत जिल्हास्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गरीब नागरिकांच्या अन्नधान्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

रावेर तालुक्यातील विविध रेशन दुकानांवर अलीकडेच वितरित झालेली ज्वारी अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून समोर आल्या होत्या. अनेकांनी ही ज्वारी खाण्यायोग्य नसून गुरांना टाकावी लागेल, अशी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते आणि पुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

या संदर्भात स्थानिक पातळीवर पुरवठा विभागाकडून पंचनामा करण्यात आला असला, तरीही तीच ज्वारी लाभार्थ्यांना वितरित झाल्याचे समोर आले. या गंभीर बाबीकडे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने लक्ष वेधत वृत्त प्रकाशित केल्यानंतर या प्रकरणाला अधिक वेग आला. वृत्ताची दखल घेत आमदार अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
आमदार जावळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या मतदारसंघात नागरिकांच्या आरोग्याशी व अन्नधान्याशी खेळ करणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.” त्यांनी सांगितले की उद्याच जिल्हास्तरीय पथक रावेर तालुक्यात दाखल होणार असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या तात्काळ हस्तक्षेपामुळे रेशन लाभार्थ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून गरीब जनतेच्या प्रश्नांवर आमदारांनी घेतलेली भूमिका सकारात्मक असल्याचे नागरिकांचे मत आहे. अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
या प्रकरणामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून चौकशीनंतर दोषींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



