नवी दिल्ली, वृत्तसंस्था ।नारदा घोटाळ्यातील एक आरोपी पश्चिम बंगाल मधील तत्कालीन तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी भाजपमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून अधिकारी यांचा नारदा घोटाळ्यासंबंधित व्हिडिओ अचानक ‘गायब’ झाला आहे.
तृणमूल काँग्रेस नेते सुवेंदू अधिकारी यांचा २०१६ सालच्या चर्चित नारदा घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. या स्टिंगची टेप अनेक न्यूज चॅनेल्सना पाठवण्यात आली होती. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे काही नेते लाच घेताना या टेपमध्ये दिसत होते. हा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून शेअरही करण्यात आला होता. मात्र, सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये एन्ट्री घेतल्या घेतल्या त्यांच्यावर आरोप करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून नाहिसा झालाय.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी यावरून गृहमंत्री अमित शहांवर टीकास्त्र सोडले आहे. ‘भाजपच्या यूटयूब चॅनलवरून कथित नारदा घोटाळ्याचा व्हिडिओ काढून टाकण्यात आलाय. अमित शहा यांची जादूची लॉन्ड्री मोहीम पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे. भाजपमध्ये सामील व्हा- धुतलेले आणि स्वच्छपणे समोर या’ असा टोला महुआ मोईत्रा यांनी हाणलाय.