नागपूर येथे वन भवनाचे लोकार्पण

नागपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा  | सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या कार्यामुळेच महाराष्ट्राच्या वनखात्याला देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळाले, असे गौरवोद‌्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होते नागपूर येथे वन भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे !

 

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्य वनबल प्रमुख वाय.एल.पी.राव, आमदार आशिष जयस्वाल, आमदार देवराव होळी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकुद्दे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी ही विकासाच्या रथाची दोन चाके व्यवस्थित चालतील, असे काम मुनगंटीवार यांनी केल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कोट्यवधींचा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वन्यजीव आणि वनक्षेत्रात वाढ झाली. अगोदरच्या पाच वर्षांत वन विभागात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले काम जगाचे लक्ष वेधणारे आहे. केवळ वृक्षारोपणापर्यंतच ही जनचळवळ थांबली नाही, तर वृक्षांचा वाढदिवसही साजरा केला जाऊ लागला. कार्यकुशलता आणि वक्तृत्व या दोन्ही गोष्टी मुनगंटीवार यांना दैवी देणगी असल्याचे ते म्हणाले.

आपल्या भाषणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाचे मध्यवर्ती, झिरो माईलचे ठिकाण असलेल्या नागपुरातील ‘वन भवन’ हे खऱ्या अर्थाने ‘समाधान भवन’ व्हावे. जगातील १४ देशांमध्ये वाघ आहे. त्यातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत. भारताचे ‘टायगर कॅपिटल’ म्हणुन नागपूरची जगभरात ओळख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ठाण्याचे वाघ म्हणून ओळखल्या जातात. ‘टायगर कॅपिटल’ मध्ये ठाण्याच्या ढाण्या वाघाचे स्वागत करताना आनंद होत असल्याचा आगळावेगळा उल्लेख मुनगंटीवार यांनी करताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाट झाला. मुख्यमंत्र्यांसाठी ‘वन’ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. जेंव्हा आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला तेंव्हा स्वतः एकनाथ शिंदेजी यांनी कोणाचाही मदत न घेता एक लाख वृक्ष लावले होते.

शास्त्र सांगते की, जो मुक्या जीवांची भाषा ऐकतो, त्याची भाषा देवही ऐकत असतो. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी आपली सर्वांची आहे. वन भवनाची ईमारत ‘जी फाइव्ह’ आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी ट्वेन्टी’चे अध्यक्षपद स्वीकारताना त्यातील महत्त्वाचा विषय पर्यावरण आणि पर्यावरणीय बदल असल्याचे नमूद केले. आईची सेवा आणि वनराईची सेवा ही अतिशय मूल्यवान असल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

पर्यावरणातील वाढते प्रदूषण हा चिंता आणि चिंतनाचा विषय आहे. यावर मोठे विचारमंथन होत आहे. २००० ते २०२२ पर्यंत जगात प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. प्रदूषणात ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माणूस स्वत:च्या आरोग्याची काळजी करतो; परंतु पृथ्वी आणि पर्यावरणाच्या आरोग्य संतुलनाची काळजी करीत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वन आणि जीवन ह्याचा शब्दशः जवळचा संबंध आहे. जीवनाचा ‘जी’ हा वनाशी खूप जवळचा आहे. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी आहे, देशाचा झिरो माईल बिंदू इथे आहे, अशा देशाच्या हृदयस्थानी वन विभागाचं कार्यालय आहे. जसं मनुष्याच्या हृदयाचं कार्य असतं की अशुद्ध रक्त शुद्ध करणे, या कार्यालयात देखील हेच कार्य आहे. जी जी पर्यावरणात म्हणून अशुद्धता असेल, ती ती अशुद्धता शुद्ध करणे हेच काम या कार्यालयाचे आहे.

 

Protected Content