नशिराबादजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव प्रतिनिधी । जळगावातून नशिराबादकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १३ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी १४ डिसेंबर रोजी ट्रक चालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, बापूराव चैत्राम शिलावट रा. दत्तसागर हॉटेलच्या मागे नशिराबाद ता. जि.जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार 13 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बापूराव शिलावट हे जळगाव येथून नशिराबादकडे (एमएच १९ डीटी ४०२६) या क्रमांकाच्या दुचाकीने सरस्वती फोर्ड शोरूमसमोरून घरी जात असताना  भुसावळकडून येणारा भरधाव ट्रक क्रमांक (आरजे ४७ जीए ९५४) याने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बापूराव चैत्राम हे गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. यासंदर्भात मयताचा मुलगा दिनेश बापूराव सिलावट यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रलाल हिरालाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात मंगळवार १४ डिसेंबर रोजी दुपारी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

 

Protected Content