यावल, प्रतिनिधी । नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्राने नुकतीच मान्यता दिली आहे. यानुसार देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व्यवसाय कौशल्यावर आधारित असल्याने याधोरणाचे जळगाव म. भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी स्वागत केले आहे.
प्रवीण जाधव यांनी वर्तमान शिक्षण पद्धती ही ज्ञानावर आधारित असून यात कौशल्याचा अभाव असल्याचे म्हटले आहे. यामुळे बेरोजगारीत वाढ होते आहे. अश्या परिस्थितीत नवे शैक्षणिक धोरण हे ३४ वर्षानंतर विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाकडून व्यवसायिक शिक्षणाकडे नेणारे असणार आहे. प्रामुख्याने इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून किवां प्रादेशिक भाषेतून देण्यात प्राधान्य असल्याने प्रादेशिक भाषांचा विकास होईल .सहावीपासून व्होकेशनल अभ्यासक्रम शिकता येणार आहे.शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना इयत्ता १२ वी नंतर ४ वर्षाचा बी.एड. बहु शाखीय शैक्षणिक अभ्यासक्रम करावा लागेल. शिवाय विषयांचे वैविध्य पण असेल विविध विषय निवडण्याची संधी असणार आहे. विज्ञान शिकताना संगीत, बेकरी स्पोर्ट्स, लोककला हे अभ्यासाचे विषय म्हणून निवडता येणार आहे. नवे शैक्षणिक धोरण क्रांतीकारक आहे. देशाच्या विकासासाठी, वेगाने बदलत असलेल्या जागतिक आर्थिक रचना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधी यांना तत्परतेने प्रतिसाद देणारे धोरण असल्याने याकडे विकसनशील या दृष्टीने बघण्याची गरज असून ते स्वागताहर्य असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.