नवी मुंबई वृत्तसंस्था । नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता सनदी अधिकारी अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित बांगर हे नवे आयुक्त म्हणून लवकरच पदभार स्वीकारतील.
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीचे कारण तर नाही ना, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. अण्णासाहेब मिसाळ यांच्या बदलीमुळे महापालिकेत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आण्णासाहेब मिसाळ यांच्यासह आणखी दोन सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. विजय राठोड यांची मीरा भाईंदर मनपा आयुक्तपदी तर डॉ. राज ध्यानिधी यांची उल्हासनगर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अभिजित बांगर कोण आहे ?
अभिजीत बांगर २००८ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. युवा आणि धडाडीचे सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या नागपूर विभागाचे अतिरीक्त आयुक्त आहेत. १४ महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.
अभिजित बांगर यांनी १४ महिन्याच्या कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली, स्वच्छ भारतमध्ये नागपूरचा क्रमांक सुधारला. त्यानंतर त्यांची बदली वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून झाली. मात्र त्यांनी पदभार स्विकारला नव्हता. शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
उल्हासनगर, मीरा भाईंदर महापालिकेला नवे आयुक्त
दुसरीकडे, राज दयानिधी यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर विजय राठोड यांची मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या या कामाचा आढावा घेऊनच केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.