पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरखर्चासाठी व गाडी घेण्यासाठी माहेरहुन १ लाख रुपये आणावे या मागणीसाठी नगरदेवळा ता. पाचोरा येथील माहेरवाशिणीचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पतीसह सासरकडील पाच जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, नगरदेवळा येथील गायत्री हिचा विवाह १३ मे २००५ रोजी दिनकर भाईदास पाटील यांचेशी फाफरे ता. अमळनेर येथे झाला होता. लग्नानंतर चार वर्ष सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाल्यानंतर गायत्री हिच्या चारित्र्यावर संशय घेत शारिरीक व मानसिक छळ सुरू झाला. तसेच माहेरहुन गाडी घेण्यासाठी व घरखर्चासाठी १ लाख रुपये आणावे अशी मागणी देखील सासरच्या मंडळींकडून होवु लागली. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर गायत्री हिने पाचोरा पोलिस स्टेशन गाठत दिनकर भाईदास पाटील (पती) ह. मु. नवागाम, दिंडोरी रोड, गोवर्धन नगर, प्लाॅट नं. ४२, उधना (सुरत), दुर्गाबाई भाईदास पाटील (सासु) रा. उधना (सुरत), गुलाब भाईदास पाटील (दिर) रा. उधना (सुरत), मिराबाई नाना पाटील (नणंद) रा. एकदंत सोसायटी, गट क्रं. ४२, यावल रोड, चोपडा व राहुल नाना पाटील (नंदोई) रा. एकदंत सोसायटी, चोपडा या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विनोद पाटील हे करीत आहे.