नवाब मलिक यांनी भाजपला पुन्हा डिवचले

 

मुंबई : वृत्तसंस्था । माजी आमदार आणि भाजप नेते शिरीष चौधरी यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवैध साठा  करून मोफत वाटप केल्याचा आरोप करून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे

 

 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी केली होती. या चौकशीवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरही टीका केली होती. फडणवीस आणि भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या टीकेवरून मलिक यांनी पलटवार केला आहे.

 

“देशात ऑक्सिजनचा ,  रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. पण, काही पक्षाना राजकारण करण्याशिवाय काहीच काम नाही. महाराष्ट्रात भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे. देशातील सात रेमडेसिवीर कंपन्यांना केंद्राने परवानगी दिलेली आहे. दुसरीकडे रुग्णांचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रेमडेसिवीर भेटत नसल्याचं चित्र होतं. त्यावेळी सुरतच्या भाजपा कार्यालयात रेमडेसिवीर वाटलं जात होतं. यावर आम्ही प्रश्न उपस्थित केल्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला की, याबाबत आम्हाला काही माहिती नाही,” असं मलिक म्हणाले.

 

“भाजपाचे काही नेते रेमडेसिवीर इंजेक्शनचे ५० हजार वाईल्स महाराष्ट्र सरकारला आणून देऊ, असा दावा करु लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाउनमध्ये उपलब्ध झाला होता. ते चालवणारे एक भाजपाचे नेते आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथून अपक्ष निवडून आले आणि २०२९च्या निवडणुकीत भाजपाकडून पराभूत झाले होते. नंदूरबारमधील हिरा एक्झक्युटिव्ह हजारो रेमडेसिवीरचा साठा करुन ठेवला होता. त्यांनी आठ तारखेला लोकांना वाटप केलं. वीकेंड लॉकडाउननंतर १२ एप्रिलला पुन्हा वाटप केलं. ब्रुक फार्माचे २० हजार पेक्षा जास्त रेमडेसिवीर वाईल्स आणून ठेवली होती. हे करण्यासाठी शिरीष चौधरी आणि त्यांच्या स्टाफकडे एफडीएचा कोणता परवाना होता का? बेकायदेशीरपणे रेमडेसिवीर आणतात आणि वाटतात. तिच व्यक्ती प्रविण दरेकरांना घेऊन राजेंद्र शिंगणे यांना भेटले होते. आता एफडीएने नंदूरबार जिल्ह्याधिकाऱ्यांना चौकशी करण्याची सूचना केली आहे,” अशी माहिती नवाब मलिकांनी दिली.

 

“राज्यात तुटवडा असताना आणि रेमडेसिवीर देण्यात अडवणूक होत असल्याचं मी म्हटलं होतं. ब्रुक फार्माला महाराष्ट्र एफडीएने पत्र दिलं होतं. त्यावर दमणच्या एफडीएने रेमडेसिवीर देता येणार नाही, सांगितलं. म्हणून मी मुद्दा उपस्थित केला होता की, केंद्राकडून अडवणूक होतेय. मग केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी चर्चा केली. आता ब्रुक फार्माच्या मालकाला वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री वकीलपत्र घेत आहेत. माझ्या जावयाचा प्रश्नच नाही. कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. जावयाच्या सुटकेसाठी मी बोलत नाही. पण, कालपासून काहीजण माझ्याकडे बोट दाखवत आहे. क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगतोय की, किती कारभार पारदर्शी चालतो लवकर दाखवेल. माझा राजीनामा मागत आहेत. राज्यपालांकडे जात आहेत, मी त्यांना विचारतोय की देशात कुठला मोदी कायदा आलाय का? त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राज्यपालांना दिले आहेत का? मग त्याची माहिती आम्हालाही द्या. काळा बाजार आणि साठा करणाऱ्यांना भाजपा का वाचवत आहे?,” असा सवाल मलिक यांनी केला.

Protected Content