धरणगाव, प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीच्या एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केला होता. याप्रकरणी शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसीलदार नितिन कुमार देवरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना निवेदन देत मारेकऱ्याला फाशी द्या, अशी मागणी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीच्या एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केल्याची घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आली होती. तिचे वडील रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. अशा परिस्थितीत त्यांनी मुलीचे लग्न केले. लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांना आपल्या मुलीच्या दुर्दैवी अंत बघावा लागला. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मुलीला सुरक्षितता वाटली पाहिजे प्रत्येक स्त्री ला निर्भयपणे जगता आले पाहिजे, असा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पिडीत नवविवाहिता आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करणार आहेत.
शिवसेना तालुका धरणगाव व महिला आघाडी वतीने दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत. यात वैष्णवी गोरेंच्या खुनाचा पोलीस यंत्रणेद्वारा निष्पक्ष कोणतीही त्रुटी न राहता कमीत कमी वेळात तपास पूर्ण करून न्यायालयात खटला दाखल करणे, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तज्ञ सरकारी वकिलांची नेमणूक करणे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी धरणगाव माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, नगरसेविका अंजली भानुदास विसावे, कीर्ती किरण मराठे, आराधना नंदलाल पाटील, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाताई धनगर, भारतीताई धनगर, सुनिता चौधरी, प्रा. कविता रमेश महाजन, हेमांगी अग्निहोत्री आदी उपस्थित होते.