जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नजरचूकीत नवजात शिशूंची अदलाबदल झाल्याचा प्रकार मंगळवारी २ मे सकाळी ११ वाजता रोजी घडला आहे. दोन नवजात शिशुंची अदलाबदल झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पालकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालय प्रशासनाने दोन्ही बाळांना ताब्यात घेत नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. पोलिसांमार्फत डीएनए टेस्टद्वारे हे शिशु आता खऱ्या मातांच्या स्वाधीन होणार आहेत. हा प्रकार परिचारिकांच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे घडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रसूतीसाठी सुवर्णा सोनवणे (वय-२०) आणि प्रतिभा भिल (वय-२०) या दोन्ही गरोदर महिला भरती झाल्या होत्या. त्यांची प्रकृती अत्यावस्थ होती. झटके येत होते. त्यामुळे त्यांचे तातडीने सिझर करण्याचा निर्णय स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाकडून घेण्यात आला. शस्त्रक्रिया विभागात पाच ते दहा मिनिटांच्या अंतराने दोघींचे सिझर झाले. एकीला मुलगा व दुसरीला मुलगी झाली.
पण नवजात शिशु पालकांकडे सोपविताना प्रशिक्षणार्थी परिचारिका विद्यार्थीनिकडून संबंधित पालकांना निरोप देण्यात गोंधळ झाला. यामुळे त्यांची अदलाबदल झाली. काही वेळाने ही चूक उघड होताच प्रसूती कक्षात एकच गोंधळ उडाला. दोन्ही नवजात शिशुंचे पालक आक्रमक झाले. त्यांनी डॉक्टर व परिचारिकांना धारेवर धरले. मुलगा व मुलगी नेमकी कोणत्या पालकांची हेच समजत नसल्याने पालकांचा गोंधळ उडत होता.
खरे पालक शोधण्यासाठी आता दोन्ही शिशु आणि मातांची डीएनए टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. दोन्ही माता अत्यावस्स्थ असल्याने अतिदक्षता विभागात दाखल आहेत. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी चौकशी समिती गठीत केली आहे. डीएनए चाचणी रक्ताच्या नमु्न्यांच्या आधारे केली जाते. हे नमुने नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.