मुंबई : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद असे शीर्षक देऊन ट्विटरवर फोटो पोस्ट करीत महाराष्ट्र काँग्रेसने आज मोदी यांची खिल्ली उडवली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रसारमाध्यमांसमोर यायला घाबरतात अशी टीका मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून केली जाते. असं असतानाच आज मात्र महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पत्रकार परिषदेतील फोटो पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट केलेल्या या फोटोची सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अकाऊंटवरुन दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी पहिला फोटो राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं आहे. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये काहीच दिसत नसून केवळ ब्लॅक आऊट झालेला काळा आयताकृती फोटो पोस्ट करण्यात आलाय. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी पत्रकार परिषदेमध्ये आलेच नाहीत असं या फोटोमधून अधोरेखित करण्यात आलं आहे.
हा फोटो शेअर करताना महाराष्ट्र काँग्रेसने #BJPFearsRahulGandhi हा हॅशटॅगही वापरला आहे. पत्रकार परिषदेतील राहुल गांधी आणि कधीही पत्रकार परिषद न घेणारे मोदी अशी तुलना करत काँग्रेसने, “..म्हणूनच भाजपा राहुल गांधींना घाबरते,” असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
या ट्विटखाली काहींनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून काही काँग्रेसच्या बाजूने तर काही भाजपाच्या बाजूने आहेत. एकाने राहुल गांधींचा उल्लेख पप्पू असा करत भाजपाला पप्पूसाठी वेळ नाही असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने काँग्रेसची बाजू घेत म्हणून भाजपा राहुल गांधींचे ट्विट डिलीट करण्यासाठी ट्विटरवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते अशी टीका केलीय.
सध्या सोशल नेटवर्किंगवर काँग्रेसने उपहासात्मक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावलेल्या या टोल्याची चांगलीच चर्चा रंगल्याचं चित्र दिसत आहे. या फोटोवर दोन्ही बाजूचे समर्थक कमेंट करतानाचं चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर #BJPFearsRahulGandhi या हॅशटॅगची चांगलीच चर्चा सुरुय.