नगरसेविकेच्या नावाच्या बनावट स्टॅम्प तयार करून आधारकार्ड बनवून देणाऱ्या तीन जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । नगरसेविकेच्या नावाचा बनावट स्टॅम्प तयार करून आधारकार्ड नवीन व अपडेट करून देण्याचा प्रकार आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळील संजय गांधी निराधार कार्यालयात उघडकीला आला आहे. याप्रकरणी तीन जणांना शहर पोलीसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमर भालचंद्र येवले (रा. खोटेनगर) व इरफान जहिर शेख (रा. मलिकनगर), पियुष विनोद नवाल (रा. रायपुर फाटा, कुसुंबा) असे तीन संशयितांची नावे असून मेहरुण भागातील प्रभाग क्रमांक १५ क च्या नगरसेविका शबानाबी सादीक खाटीक यांच्या नावाने हा बनावट स्टॅम्प बनवला आहे.  

अधिक माहिती अशी की, रेल्वेस्थानक परिसरातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात नगरसेविका खाटीक यांच्या नावाचा बनावट स्टॅम्प तयार करुन लोकांना आधारकार्ड तयार करुन देणे व अपडेट करण्याचे काम सुरू होते. नईम बशीर खाटीक (रा. मेहरुण परिसर) याच्या लक्षात ही बाब आली. नईम खाटीक, सलमान खाटीक, नगरसेवक प्रशांत नाईक यांनी थेट संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय गाठले. या ठीकाणी अमर भालचंद्र येवले (रा. खोटेनगर) व इरफान जहिर शेख (रा. मलिकनगर) हे दोघे नागरीकांना आधारकार्ड तयार करुन देण्यासाठी नगरसेविका खाटीक यांच्या बनावट स्टॅम्पचा वापर करीत असल्याचे आढळून आल्याने दोघांना शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता हा स्टॅम्प पियुष विनोद नवाल (रा. रायपुर फाटा, कुसुंबा) याच्याकडून आणल्याचे अमर व इरफान यांनी सांगीतले. तिघांना शहर पोलीसांनी अटक केली आहे.  या प्रकरणी सलमान खाटीक याने दिलेल्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस उपनिरीक्षक अरुण सोनार तपास करीत आहेत.

Protected Content