भडगांव. प्रतिनिधी | नगरदेवळा येथील आसपासच्या तब्बल २८ खेड्यांची आस्था असलेल्या व प्रदीर्घ परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सवास आजपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे गावात भाविक भक्त, व्यापारी, दुकानदारांची, लगबग सुरू झाली आहे.
यात्रोत्सवात उद्या (दि.१०) सोमवार रोजी दुपारी २.०० वाजता प्रतीवर्षाप्रमाणे राम मंदिर चौकातुन पालखी सोहळ्यास सुरूवात होऊन, मारवाडी गल्ली, राऊळ गल्ली, अग्नावती बाजार चौक,सराफ बाजार,वाणीगल्ली, मार्गे खंडेराव महाराज मंदिरा पर्यंत मिरवणुक निघणार आहे. दि.११ मंगळवार रोजी दुपारी ४.०० वाजता तगतराव मिरवणुक निघुन रात्री टाकळी रोडलगतच्या यात्रोत्सव प्रांगणात स्थानिक लोककलावंत रतन-सोमनाथ तमाशा मंडळाचा तमाशा रंगणार आहे. दि.१५ शनिवार रोजी दुपारी ११.०० ते ५.०० दरम्यान कुस्त्यांचा जंगी मैदानी आखाडा भरणार असून यावर्षी यात्रोत्सव पंचमंडळाने ग्रामिण भागातील मल्लविद्या पुन्हा जोमाने फुलावी यासाठी प्रमुख तीन मोठ्या मानाच्या कुस्त्यांसाठी विजेत्या मल्लांना चांदीच्या मोठ्या गदा बक्षीस ठेवल्या आहेत तर उर्वरीत सर्व विजेत्यांनाही भरगच्च बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.
तब्बल १०-१२ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात कच्या मसाल्याचे पदार्थ, नवनविनभांडे, कापड खरेदी, धार्मिक विधी साहीत्याची खरेदी-विक्रीची उलाढाल प्रचंड प्रमाणात होत असतेच, सोबतच यात्रोत्सवा दरम्यान येणारा सोमवार बाजारही यात्रेतच भरवला जात असल्याने या यात्रोत्सवास प्रचंड गर्दी होत असते.