नंदूरबारमध्ये सव्वा दोन लाख कोंबड्या नष्ट

 

 

नंदूरबार : वृत्तसंस्था । देशभरात कोरोनाचं संकट असताना आता राज्यात पुन्हा बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारमधील नवापूर तालुक्यात देशातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन सुरु आहे. नवापूरमध्ये तब्बल सव्वा दोन लाख कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.

यामुळे एका व्यावसायिकाचे तब्बल 10 कोटींचे नुकसान होणार आहे. 

नवापुरातील एका व्यवसायिकाचे  जर्मन तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक दहा कुकुट शेड आहे. सव्वा दोन लाख कोंबड्या किलिंग ऑपरेशनने नष्ट करण्यात येणार आहेत. सलाम बलेसरिया असे या व्यावसायिकाचे नाव आहे. पहिल्या दिवशी 44 हजार 902 पक्ष्यांचे किलिंग करण्यात आले आहे.  दुसऱ्या दिवशी 39 हजार 311 कुकुट पक्ष्यांचे किलिंग करण्यात आले असून दोन दिवसात 84 हजार 213 कुकुट पक्ष्यांना नष्ट करण्यात आले आहे. जवळपास 20 पशुसंवर्धन पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

उन्हाळ्याचे दिवस असल्याने पीपीई कीट घालून हे ऑपरेशन करताना पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घामाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना मळमळ, उलटी आणि प्रकृतीत बिघाड होण्याचे प्रमाण वाढले. आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि आरोग्य टीममार्फत तात्काळ उपचार केला जात आहे.

 

शोली पोल्ट्रीतील उर्वरित दोन दिवसात 1 लाख 52 हजार 078 कुकुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. 30 लाख अंडीही नष्ट करण्यात आली आहेत. नवापूर तालुक्यात आतापर्यंत 30 पोल्ट्रीतून सात लाखांवर कुकुट पक्षी आणि 27 लाख अंडी नष्ट करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यात पुन्हा बर्ड फ्लू होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

 

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना 12 जानेवारी 2021 नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावलेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

 

कुक्कुटपालन करणाऱ्यांनी किंवा कुक्कुट पक्षी पाळणाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे

Protected Content