नंदीग्राममधून निवडणूक लढवणं ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, पंतप्रधानांची टीका

 

 कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये प्रचारसभेत पंतप्रधान  मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली “ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूलमधले लोकं सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली आहे”, असं मोदी म्हणाले.

 

 

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. खुद्द ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची निवड केल्यामुळे या मतदारसंघात बिग फाईट पाहायला मिळत आहे.

 

ममता बॅनर्जी  दरवेळी कोलकातामधील भोवानीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. यंदा मात्र त्यांनी हट्टाने नंदीग्राम मतदारसंघाची निवड केली. तृणमूलमधील त्यांचेच एकेकाळचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनाच भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राममधून उमेदवारी दिली आहे. नंदीग्राममध्ये अधिकारी समाजाचं प्राबल्य असल्यामुळे सुवेंदू अधिकारी यांना त्याचा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, तरीदेखील ममता बॅनर्जींनी या मतदारसंघाची निवड केली.

 

पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांच्या वाराणसीविषयीच्या विधानाचा देखील समाचार घेतला. ममता बॅनर्जी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाण्याचं आव्हान दिलं आहे. त्यावर  मोदी म्हणाले, “वाराणसीमध्ये ममता बॅनर्जींना मोठ्या मनाचे, टिळा लावलेले आणि शेंडी असलेले लोकं भेटतील. त्याची त्यांना अडचण होईल. इथे त्यांना जय श्रीराम घोषणेचा राग येतो, तिथे त्यांना हर हर महादेव देखील ऐकायला मिळेल”, असं मोदी म्हणाले आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी तृणमूल काँग्रेसची खिल्ली देखील उडवी. “ममता दीदी तुम्ही बंगालच्या नागरिकांवर विश्वास ठेवायला हवा. बंगालच्या लोकांनी त्यांचा कौल दिला आहे. त्यांचा निर्णय झालाय की तुम्हाला तुमची टाका मार कंपनी (टीएमसी) घेऊन इथून निघून जावं लागेल”, असं मोदी म्हणाले आहेत.

Protected Content