मुंबई (वृत्तसंस्था) चिनी अॅप्सच्या धोक्याची माहिती आपल्याला आधीच होती तर या कंपन्या का सुरु होत्या? आमच्या वीस जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरु राहिल्या असत्या, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.
भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यावर संजय राऊत हे आज पत्रकारांशी बोलताना म्हटले की, चिनी अॅप्सवरील बंदीचे मी तुर्तास स्वागत करतो. पण तुमची गोडीगुलाबी झाल्यावर हा धोका, गुलाबजाम होता असे होवू नये, असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे. चीनच्या गुंतवणूतीबाबतही आर्थिक धोरण ठरवले पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसोबत जसे संबध जोपासले जातात तसे होवू नये. तसेच राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही. देशातील सर्व नागरिक राष्ट्रभक्त आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.