पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना हा पक्ष अंतर्गत विरोधामुळे फूट पडल्याचा दावा भाजप नेते करत असले तरी बिहारमधील बड्या भाजप नेत्याने आम्हीच शिवसेना फोडल्याचे वक्तव्य केले आहे.
बिहारमध्ये राजकीय भूकंप घडला असून सत्तांतर झाले आहे. अर्थात, नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व घडामोडींवर बिहार भाजपाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांना इशारा देताना महाराष्ट्रात भाजपाने शिवसेना का फोडली हे देखील सांगून टाकले आहे.
या संदर्भात सुशील मोदी म्हणाले, भाजपाने नितीश कुमार यांना जेवढा सन्मान दिला तेवढा सन्मान त्यांना राजद, कॉंग्रेससोबत मिळू शकणार नाही. १९९६ पासून पाहिलं तर, अटलबिहारी वाजपेयी असो किंवा नरेंद्र मोदींचं सरकार असो, भाजपाने त्यांना सन्मान दिला. त्या सन्मानालाच त्यांनी धोका दिला. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी ४० आमदार हवे आहेत. त्यांच्या पक्षाला भाजपाने फोडलं असतं तरी सरकार स्थापन झालं असतं का? आम्ही का त्यांचा पक्ष फोडू? त्यांच्या ४५ आमदार होते तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं. आम्हाला काही करायचं असतं तर आम्ही तेव्हाच फोडाफोड केली असती. मात्र, भाजपाने कधीही आपल्या मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचाच पक्ष आम्ही फोडला. महाराष्ट्रात आम्हाला धोका देणार्या शिवसेनेला आम्ही फोडल्याचे सुशील मोदी म्हणाले.