जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विविध परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेच्या आत लागावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले असून कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी व प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी स्वतंत्रपणे धुळे व जळगाव जिल्ह्यातील ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांना अकस्मात भेटी दिल्या.
परीक्षा झाल्यानंतर किमान ३० व कमाल ४५ दिवसात निकाल घोषित करणे आवश्यक आहे. यासंदर्भात राज्यपाल तथा कुलपती यांनी काही दिवसांपूर्वी विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लावण्याबाबत सूचना दिल्या होत्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने याबाबतीत तातडीने काही पावले उचलली. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी त्याआधी २ मे रोजी प्राध्यापकांना पत्र लिहून परीक्षा मूल्यांकनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. बुधवार दि.३१ मे रोजी कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी धुळे जिल्ह्यातीलक काही उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांना अचानक भेटी दिल्या. उत्तरपत्रिका तपासणी करणाऱ्या प्राध्यापकांसमवेत चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सर्वत्र योग्य प्रतिसाद मिळत असल्याचे या भेटीमध्ये कुलगुरुंना आढळून आले. प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांनी देखील जळगाव जिल्ह्यातील काही केंद्रांना भेटी दिल्या. सध्या विद्यापीठाने ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणीसाठी ६८ केंद्रे कार्यान्वित केली आहेत.
याशिवाय विद्यापीठाने मूल्यांकनात शिक्षकांचा सहभाग वाढावा यासाठी शिक्षकांच्या उन्नत अभिवृध्दी योजनेअंतर्गत पदोन्नतीचा लाभ मिळणेसाठी प्रस्ताव दाखल करतांना पेपर सेटींग किंवा उत्तरपत्रिका मूल्यांकनाच्या कामकाजात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच मूल्यांकनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना विद्यापीठाच्या विविध समित्यांवर कामाची संधी प्राधान्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व उपायांमुळे निकाल वेळेवर लागणे अपेक्षित आहे.