जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंदनगर, जिल्हापेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या तब्बल १९ जबरी चोरीतील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात रामानंदनगर पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन २०१८ पासून जबरी चोरीचे करीत असलेला संशयित आरोपी दत्तात्रय अमृत बागुल (वय- 39, रा. मोहाडी जि. धुळे ह.मु. जळगाव) आणि सुधाकर उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (वय-२५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण) या दोन जणांना अटक करण्यात आली होती. या दोघांची सखोल चौकशी केली असता दोघांनी तब्बल १९ जबरी चोरी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले १५ गुन्हे तसेच जिल्हापेठ पोलीस हद्दीतील २ तर एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील २ असे एकूण १९ जबरी चोरी व चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश होता. या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पोलीसांनी २६ तोळे सोने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, विजय खैरे, प्रवीण वाघ, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, पोलीस शिपाई उमेश पवार, अनिल सोनवणे आणि दीपक वंजारी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.