पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान धरधाव वेगाने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मधुन तोल जावुन पडल्याने उत्तरप्रदेश येथील एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून घटने प्रकरणी पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इसरार इसहाक (वय – २२) रा. डिवाह ता. डिवाह जि. बहराईच (उत्तर प्रदेश) हा युवक मुंबई येथे कामानिमित्त जाण्यासाठी १५ मार्च रोजी लखनौ येथुन पुष्पक एक्सप्रेसमध्ये बसला होता. दरम्यान १६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने पुष्पक एक्सप्रेसने पाचोरा स्थानक क्रास केले असता रेल्वे कि.मी. खंबा क्रं. ३६३ / १९ / २० नजीक इसरार याचा तोल गेल्याने तो खाली पडताच त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती रेल्वेचे गार्ड यांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर कळविल्यानंतर लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिस स्टेशनचे एएसआय. किशोर वाघ हे तात्काळ रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होवून किशोर वाघ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने इसरार इसहाक याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन या घटनेचा पुढील तपास चाळीसगावचे एपीआय किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय किशोर वाघ हे करीत आहे. मयत इसरार याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.