धान्य वाटपात पारदर्शकता येईल तोपर्यंत आमचा लढा कायम – माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे

सावदा प्रतिनिधी । रेशनदुकानातून लाभार्थ्यांना धान्य कमी देवून काळाबाजार करणाऱ्या रेशनदुकानदाराचा परवाना जिल्हा पुरवठा विभागाने रद्द केला. या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. मात्र जोपर्यंत स्वस्त धान्य वाटपात पारदर्शकता येत नाही तोपर्यंत लढा कायम राहिल असे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सांगितले.

श्री. वानखेडे यांनी पुढे सांगितले की, स्वस्त धान्य वाटपात अनेक घोळ होत आहे. लॉकडाऊन मुळे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात मोफत मिळणाऱ्या धान्य वाटपासाठी संभाव्य याद्यांमध्ये मोठा घोळ होण्याची शक्यता असल्याने प्रांताधिकारी व तहसीलदार यांना याबाबत माहिती देण्यात आले आहे. त्यानंतर आज महसूल विभागाने स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करून प्रत्यक्ष शिधा पत्रिकाधारक यांच्याशी ही बोलून सत्यता पडताळून पाहिली. त्यात तथ्य आढळून आल्याने जे स्वस्त धान्य दुकानदार घोळ करतील त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे धोरण प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी अवलंबिले आहे. या कारवाईचे आम्ही तर स्वागत करतोच आहोत. आणि जनताही समाधान व्यक्त करीत आहे.

जोपर्यंत स्वस्त धान्य वितरण प्रणालीतील घोळ पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत महसूल विभागाने धान्य वितरणाकडे लक्ष ठेवावे. गोरगरीबांचे हक्काचे धान्य त्यांना तातडीने मिळावा यासाठी आम्ही जातीने लक्ष ठेवणे हे लोक प्रतिनिधी म्हणून आमचेही कर्तव्य असल्याने या पुढेही आम्ही जागृत राहणार आहेत, असे राजेश वानखेडे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक सिद्धार्थ बडगे, कुशल जावळे, बंटी बढे आदी उपस्थित होते.

Protected Content