पटना (वृत्तसंस्था) पाटण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पालिगंज येथील एका लग्नसमारंभात ९५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
पालिगंज येथील ३० वर्षीय तरुण हा गुरूग्राममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. आपल्या लग्नासाठी तो १२ मे रोजी आपल्या गावी पाटण्यात आला होता. याचदरम्यान, त्याला कोरोनाची लक्षणं दिसून आली. परंतु तरी देखील कुटुंबीयांनी त्याची चाचणी करण्याऐवजी लग्न लावून दिले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्या तरुणाची प्रकृती बिघडली. त्याला पाटण्यातील एम्स रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच त्याच्या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या सर्वांची करोना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुरूवातीला १५ जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर उर्वरित ८० जणांचेही करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.